मी आज पर्यंत जे पण पद मिळवलं नागरिकांच्या आशीर्वादाने... धमकी देऊन नाही..
नाशिक प्रतिनिधी:, नितिन चव्हाण
नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका तब्बल आठ ते नऊ वर्षांनंतर जाहीर झाल्याने शहराच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. निवडणुकांपूर्वी दीर्घकाळ महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्यामुळे शहरातील अनेक प्रभागांमध्ये विकासकामे ठप्प झाली होती. सिडकोसह नाशिकमधील विविध भागांत नगरसेवकांनी दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरू न शकल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते.
अशा पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मधील नगरसेवक प्रवीण (बंटी) तिदमे यांनी वेगळी भूमिका घेतली. प्रशासकीय राजवट असतानाही प्रभागातील नागरिकांना दिलेला शब्द पाळण्यासाठी त्यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवली. निधी कुठून आणायचा, हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असताना तिदमे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यामार्फत निधी मंजूर करून घेतला. कोविड काळापासून ते थेट मतदानाच्या दिवसापर्यंत रस्ते, ड्रेनेज, खड्डे बुजवणे आदी विकासकामांचा वेग कायम ठेवत त्यांनी प्रभागात बदल घडवून आणला.
या कामांमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले. “१५ वर्षांत जे झाले नाही, ते पाच वर्षांत झाले,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. उद्घाटनापुरतेच नव्हे तर लगेचच प्रत्यक्ष काम सुरू झाल्याने तिदमे यांची कार्यशैली चर्चेचा विषय ठरली. स्वतःच्या कुटुंबाला कमी वेळ देत ‘जनताच माझे कुटुंब’ असा निर्धार त्यांनी प्रत्यक्ष कामातून दाखवला. याच जोरावर त्यांनी दोन्ही पंचवार्षिक निवडणुकांत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.
दरम्यान, आज नाशिक महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुका पार पडल्या. भाजपकडून महापौरपदी हिमगौरी अडके आहेर, तर उपमहापौरपदी मच्छिंद्र सानप यांचे नाव निश्चित करण्यात आले. या निवडणुकीत शिंदे गटाकडून प्रवीण बंटी तिदमे यांनी सर्वात पहिले अर्ज दाखल करत आपली राजकीय ताकद दाखवून दिली. विलास शिंदे यांनीही शिंदे गटाकडून अर्ज भरला.
प्रवीण तिदमे यांच्या नावाची नाशिक शहरासह सिडको परिसरात जोरदार चर्चा सुरू असतानाच, शिंदे गटात अलीकडेच प्रवेश केलेल्या नवख्या उमेदवाराने अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. “पद न मिळाल्यास टोकाचे पाऊल उचलण्याची भाषा करणारा नेता कोण?” अशी चर्चा शहरभर रंगली असून, त्यामुळे शिंदे गटातील अंतर्गत राजकारणही उघड झाले आहे.
या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रवीण तिदमे यांची प्रतिमा कामाच्या जोरावर पुढे येणाऱ्या नेत्याची असल्याचे बोलले जात आहे. आजवर त्यांना मिळालेले प्रत्येक पद हे केवळ पक्षाच्या नव्हे, तर जनतेच्या विश्वासातून मिळाले असल्याची भावना समर्थकांकडून व्यक्त होत आहे. आगामी काळात नाशिक महापालिकेच्या राजकारणात प्रवीण (बंटी) तिदमे यांची भूमिका निर्णायक ठरणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
