Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

प्रवीण (बंटी) तिदमे यांच्या राजीनाम्याच्या पोस्टनंतर नाशिकमध्ये खळबळ; समर्थक थेट घरी, “नगरसेवक पद सोडू नका” अशी भावनिक साद नाशिक

 प्रवीण (बंटी) तिदमे यांच्या  राजीनाम्याच्या पोस्टनंतर नाशिकमध्ये खळबळ; समर्थक थेट घरी, “नगरसेवक पद सोडू नका” अशी भावनिक साद


नाशिक प्रतिनिधी/ नितीन चव्हाण 



शिवसेना महानगरप्रमुख तथा प्रभाग क्रमांक २४ चे नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांना उपमहापौर पदासाठी उमेदवारी न दिल्याने नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे नाराज झालेल्या तिदमे यांनी समाजमाध्यमांवर महानगरप्रमुख पदासह नगरसेवक पदाचा राजीनामा देणार असल्याची पोस्ट केल्यानंतर शहरात चर्चांना उधाण आले आहे.

या पोस्टनंतर प्रविण (बंटी) तिदमे सध्या नॉट रीचेबल असून, त्यांच्या निर्णयामुळे अस्वस्थ झालेल्या समर्थकांनी आणि प्रभागातील नागरिकांनी थेट तिदमे यांच्या निवासस्थानी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. “जनतेने भरघोस मतदान करून निवडून दिलेल्या नगरसेवकाने राजीनामा देऊ नये,” अशी ठाम भूमिका समर्थक आणि स्थानिक नागरिकांनी घेतली आहे.

तिदमे यांच्या अचानक घेतलेल्या भूमिकेमुळे अनेक कार्यकर्ते भावनिक झाले असून, त्यांनी तिदमे कुटुंबीयांची भेट घेत राजीनामा देऊ नये, अशी आर्जव केली आहे. प्रभाग क्रमांक २४ मध्ये विकासकामांसाठी तिदमे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असल्याने त्यांचा राजीनामा म्हणजे प्रभागावर अन्याय ठरेल, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, साईनाथ मंदिर परिसरातही मोठ्या संख्येने नागरिक आणि शिवसैनिक एकत्र येत तिदमे यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी जोरदार मागणी केली. “महानगरप्रमुख पद सोडले तरी चालेल, पण नगरसेवक म्हणून आमच्यासाठी काम करत राहा,” अशी भावना अनेक नागरिकांनी उघडपणे व्यक्त केली.

उपमहापौर पदाच्या उमेदवारीवरून पक्षांतर्गत नाराजी समोर येत असतानाच, तिदमे यांच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण नाशिक शहराचे लक्ष लागले आहे. प्रविण (बंटी) तिदमे आपल्या समर्थकांच्या भावनांचा विचार करून नेमका कोणता निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळासह सामान्य नागरिकही उत्सुकतेने पाहत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.