भाजप–शिवसेना युती झाल्यास उपमहापौर पद शिवसेनेकडे; प्रविण (बंटी) तिदमे यांच्या नावाची जोरदार चर्चा
नाशिक:, नितिन चव्हाण
आगामी नाशिक महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात हालचालींना वेग आला असून भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाल्यास उपमहापौर पद शिवसेनेकडे जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या संभाव्य राजकीय समीकरणात शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांचे नाव उपमहापौर पदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महापालिकेत भाजप–शिवसेना युती झाल्यास सत्तावाटपाच्या सूत्रानुसार महापौर व उपमहापौर पदांवर दोन्ही पक्षांचा समतोल राखला जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार उपमहापौर पद शिवसेनेकडे देण्याबाबत प्राथमिक चर्चा सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. प्रविण (बंटी) तिदमे हे शिवसेनेतील सक्रिय व संघटनात्मक कामासाठी ओळखले जाणारे नेतृत्व असून शहरातील विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.
त्यांच्या अनुभवाचा आणि संघटनात्मक बांधिलकीचा विचार करता उपमहापौर पदासाठी त्यांचे नाव पुढे येत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसून अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठी तसेच भाजप–शिवसेना युतीतील वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतरच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या चर्चांमुळे नाशिकच्या राजकीय वातावरणात उत्सुकता वाढली असून येत्या काळात होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
