सिडकोत गुंडगिरीचे थैमान ; प्रभाग २४ चे नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आक्रमक
प्रतिनिधी :,नितिन चव्हाण
नाशिक शहरात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारांविरोधात कडक मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेमुळे अनेक राजकीय तसेच स्थानिक गुंडांना चांगलाच चाप बसला होता. मात्र असे असतानाही सिडको परिसरात पुन्हा एकदा गुंड प्रवृत्तीने डोके वर काढल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
सिडकोतील गणेश चौक, महाराणा प्रताप चौक तसेच हनुमान मंदिर परिसरात काही गुंडांनी चारचाकी वाहनांची तोडफोड करत मोठ्या प्रमाणात थैमान घातले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही नागरिकांना अवघड झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ चे नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे हे नागरिकांचे सुरक्षा कवच बनत पुढे आले आहेत. तिदमे यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत संबंधित पोलीस ठाण्यात भेट देऊन प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी निवेदन सादर केले. परिसरात नियमित गस्त वाढवावी, सीसीटीव्ही तपासणी करावी तसेच गुंड प्रवृत्तीच्या व झोपडपट्टी दादागिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
यावेळी बोलताना प्रवीण बंटी तिदमे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, लवकरात लवकर या गुंड प्रवृत्तीला आळा घालण्यात आला नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन छेडले जाईल. प्रभागातील सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेशी कुठलीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांनी देखील प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईची अपेक्षा व्यक्त केली असून सिडको परिसरात पुन्हा एकदा शांतता व सुरक्षिततेचे वातावरण निर्माण व्हावे, अशी मागणी जोर धरत आहे.
