प्रभाग २४ मध्ये दीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम; एन-९/जी-१ सेक्टर ते औदुंबर बस स्टॉप रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन उत्साहात...
सिडको/नितीन चव्हाण
प्रभाग २४ मधील एन-९/जी-१ सेक्टर परिसरात मागील २५ वर्षांपासून प्रलंबित असलेला अत्यंत महत्त्वाचा रस्ता अखेर काँक्रिटीकरणाच्या रूपाने साकार होण्याच्या मार्गावर आहे. समाजसेवक राहुलभाऊ निरभवणे यांच्या निवासस्थानापासून औदुंबर बस स्टॉपपर्यंतचा हा रस्ता अनेक वर्षांपासून अत्यंत खराब स्थितीत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. तात्पुरत्या डांबरी थरावर करण्यात येणारी उथळ डागडुजी ही केवळ दिखाऊ उपाययोजना ठरत होती. परिणामी या रस्त्याचे कायमस्वरूपी समाधान वर्षानुवर्षे रखडतच राहिले.
या रस्त्याचे संपूर्ण खोदकाम करून आधुनिक पद्धतीने दर्जेदार काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय अखेर अमलात येत असून, या कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात आणि नागरिकांच्या उपस्थितीत पार पडले. प्रभागातील हा दीर्घकाळचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरसेवक प्रविण (बंटी) सावळीराम तिदमे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा, चिकाटी आणि लोकहितासाठीची बांधिलकी जोपासल्याने या कामाला मंजुरी मिळाली असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांत दादा शिंदे आणि मा. ना. दादाजी भुसे साहेब यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे हा रखडलेला विकास प्रकल्प मंजुरीच्या कक्षेत आणता आला. त्यांच्या हस्तक्षेपामुळेच स्थानिक नागरिकांची २५ वर्षांची अपेक्षा प्रत्यक्षात पूर्णत्वाला येत आहे.
रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे वाहतुकीतील अडथळे, पावसाळ्यातील डबेकीसारखी परिस्थिती यांना पूर्णविराम मिळणार असून सुरक्षित, मजबूत आणि टिकाऊ असा रस्ता काही दिवसांत नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांपासून कार्यालयीन कर्मचारी, महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी हा रस्ता मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. पायी जाणारे, सायकलस्वार, दुचाकीधारक आणि चारचाकी वाहनधारक यांच्यासाठीही हा रस्ता सुरक्षिततेची हमी देणार आहे.
समाजसेवक राहुलभाऊ निरभवणे, स्थानिक रहिवासी आणि प्रभागातील विविध संस्था यांनी या विकासकामाबाबत समाधान व्यक्त केले आहे. नागरिकांनी अनेक वर्षे या कामाची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रभाग २४ मधील नागरिकांच्या वतीने या कामासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिकांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. “विकासासाठी कटिबद्ध… जनतेसाठी सतत कार्यरत” हा मंत्र घेऊन नगरसेवक प्रविण (बंटी) सावळीराम तिदमे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील विविध विकासकामांना गती मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
