प्रभाग २४ च्या मतदार यादीत गंभीर घोळ; शिवसेना महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांचे निवेदन
नाशिक नितिन चव्हाण
नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ साठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या त्रुटींविरोधात शिवसेना महानगरप्रमुख तथा प्रभाग क्र. २४ चे माजी नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांनी आज महापालिका प्रशासन, जिल्हाधिकारी आणि राज्य निवडणूक आयोगाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी करत लेखी हरकत अर्ज दाखल केला. अन्य प्रभागातील याद्यांचाही अभ्यास आणि तपासणी सुरूच असल्याचे तिदमे यांनी माध्यमांना सांगितले.
शिवसेना महानगरप्रमुख तथा प्रभाग क्र. २४ चे माजी नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांनी यांनी सादर केलेल्या निवेदनानुसार प्रभाग २४ च्या मतदार यादीत इतर प्रभागांतील शेकडो नावांचा चुकीचा समावेश करण्यात आला आहे. प्रभाग २५, २६, २९ मधील सिडकोतील एन–४२, एन–५२, एन–५३ तसेच उंटवाडी, सोनवणे मळा, प्रभाग ३० आणि ३१ मधील पांडव नगरी, पार्कसाईड, वडाळा–पाथर्डी रोड येथील मतदारांची नावे प्रभाग २४ मध्ये समाविष्ट केले आहेत. विशेष म्हणजे घर क्रमांकाच्या ठिकाणी सेक्टर किंवा परिसराचे नाव मतदार यादीत स्पष्टपणे नमूद असतांनाही हेतुपुरस्कर हा घोळ घालण्यात आला आहे. प्रभाग २४ मधील ५००० हून अधिक मतदारांची नावे अन्य प्रभागात समाविष्ट केली आहेत.
याहून धक्कादायक मुद्दा म्हणजे प्रभाग २४ मधील ९३५३ मतदारांचे पत्ते ‘शून्य’ किंवा गायब आहेत, ज्यामुळे त्या मतदारांचे वास्तव्य व पात्रता संदिग्ध बनली आहे. तसेच ५५० दुबार नावे असून त्यातील अनेकांवर ‘डबल स्टार’ चिन्ह नसल्यामुळे दुबार मतदानाची शक्यता निर्माण, असा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, मतदाराला आक्षेप नोंदविण्यासाठी त्याचे ज्या प्रभागात नाव समाविष्ट असेल त्या मतदार यादीच्या पानाची प्रत अर्जासोबत जोडण्याची जाचक अट महापालिका प्रशासनाने टाकली आहे. मतदार यादी प्रभाग निहाय बनविण्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र, प्रशासनाच्या चुका मतदारांच्या माथी मारण्यात येत आहेत. स्पष्ट पत्ता नमूद असतांना दुसऱ्या प्रभागात नाव नमूद करणे म्हणजे मतदारांला मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रकार आहे. मतदाराने सर्व ३१ प्रभागाच्या याद्या शोधायच्या कश्या? ऑनलाईन सुविधा ही मनपाने उपलब्ध करून दिलेली नाही.
सन २०१७ च्या महापालिका निवडणुकीत गोविंदनगर, जुने सिडको, तिडके नगर परिसर असलेल्या प्रभाग २४ मध्येच समाविष्ट असलेली १८२७ मतदार पवननगर परिसराच्या प्रभाग क्र. २५ मध्ये, १३८९ मतदार दत्तचौक, नवीन सिडको परिसर असलेल्या प्रभाग क्र. २९ मध्ये, २६५ मतदार पाथर्डी, वासननगर परिसर असलेल्या प्रभाग क्र. ३१ मध्ये, १७४ मतदार राजीवनगर, इंदिरानगर परिसर असलेल्या प्रभाग क्र. ३० मध्ये, १२० नवे प्रभाग क्र. २८ मध्ये १०६ नावे प्रभाग क्र. २७ मध्ये, ९८ नावे प्रभाग क्र. २६ मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. तसेच २४६६ नावे मतदार यादीतून गायब झाली आहेत. १६७९८ नावे नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत.
मतदार यादीतील हा घोळ नागरिकांच्या मूलभूत मतदान हक्कावर घाला असल्याचे तिदमे यांनी स्पष्ट केले. मतदार यादीतील घोळ हा केवळ कार्यालयीन दोष नाही, तर निवडणूक प्रक्रियेच्या पवित्रतेला धोका आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. तिदमे यांनी चुकीच्या नोंदींची यादी पेन ड्राईव्हद्वारे अधिकृतपणे जमा केली आहे.
महत्वाचे मुद्दे (Highlights):
• प्रभाग २४ मध्ये इतर प्रभागांतील शेकडो नावे समाविष्ट.
• प्रभाग २४ मधील ५००० हून अधिक नावे अन्य प्रभागात.
• ९३५३ मतदारांचे पत्ते रिक्त किंवा ‘शून्य’.
• ५५० दुबार नोंदी, त्यातील अनेकांवर दुबार चिन्ह नसल्याने दोनदा मतदानाची भीती.
• नागरिकांकडून अन्यायकारक कागदपत्रांची मागणी—अमान्य व बेकायदेशीर.
• यादीतील घोळ आणि त्रुटींची यादी पेन ड्राईव्हद्वारे अधिकृतपणे जमा.
• तिदमे यांनी केली महापालिका, जिल्हाधिकारी आणि राज्य निवडणूक आयोगाला विस्तृत दुरुस्तीची मागणी.
• त्रुटीमुळे शहरातील मधील मतदारांचा मतदान हक्क धोक्यात.
-------------------प्रतिक्रिया
