इंदिरानगर पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी : घरफोडी चोरी करणारा आरोपी काही तासांत जेरबंद
नाशिक :,नितीन चव्हाण
नाशिक शहरात वाढत असलेल्या घरफोडी आणि चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क गस्त आणि "स्टॉप अॅण्ड सर्च" मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाने उत्तम कामगिरी करत काही तासांतच घरफोडी करणारा आरोपी जेरबंद केला आहे.
दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी दाखल झालेल्या गु.र.नं. ३१४/२०२५ या घरफोडी प्रकरणाची तपासणी सुरू असताना पोलिसांनी आरोपीच्या वास्तव पत्त्यावर छापा टाकला. तपासादरम्यान चौकशी केली असता आरोपीनेच गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीकडून ₹३,०५०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदर आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५, ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार अमजद पटेल करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ २) . किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या यशस्वी कारवाईत पोउपनि. संतोष फुंदे, अमजद पटेल, पोहवा. पवन परदेशी, सागर परदेशी, योगेश जाधव, दीपक शिंदे, सागर कोळी, सौरभ माळी, अमोल कोथमिरे, जयलाल राठोड आणि प्रमोद कासुदे यांनी मोलाची भूमिका बजावली.
इंदिरानगर पोलिसांच्या या तत्पर आणि कौशल्यपूर्ण कामगिरीचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
