बडदे नगर येथील भामरे मिसळ येथे.... एका युवकावर १५ जणांनी केला रोडने हल्ला...
सिडको प्रतिनिधी:,
बडदे नगर परिसरात असलेल्या भामरे मिसळ येथे काही जणांच्या टोळक्यांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवार (दि. ३० सप्टेंबर) रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून, या हल्ल्यात जॉन्सन मेढे हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जॉन्सन मेढे यांचे एका नातवाइकाचा अपघात झाल्यामुळे त्यांनी आपली चारचाकी गाडी सिटी सेंटर मॉलजवळील भामरे मिसळ येथे पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवार (दि. १ ऑक्टोबर) रोजी सकाळी गाडी घेण्यासाठी ते त्या ठिकाणी गेले असता, बेकरी मालक सय्यद आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.
या हल्ल्यात रॉड, पाईप आणि लाकडी दांडक्यांचा वापर करण्यात आला. हल्ल्यात जॉन्सन मेढे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मारहाणीच्या दरम्यान त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन अज्ञात व्यक्तींनी चोरल्याचेही समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे.
मेढे कुटुंबीयांनी संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
या घटनेने पुन्हा एकदा शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे. नागरिकांनी अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशीही मागणी स्थानिकांकडून होत आहे.
