सिडको परिसरात पुन्हा ‘बाटली राजकारण’ जोरात...
मी आहे तू घाबरू नकोस माझी महापालिकेत इंट्री झाली की तुझं काम झालं म्हणून समज
नाशिक:, नितीन चव्हाण
गेल्या काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या निवडणुकांचे वारे सुटले होते. शहरभरात राजकीय गप्पा रंगल्या होत्या, आणि या वाऱ्यांच्या झोतात अनेक इच्छुकांनी आपली ‘राजकीय तयारी’ सुरू केली होती. काहींनी तर संपर्क कार्यालयांचे उद्घाटन करून आपल्या उमेदवारीची झलक दाखवली होती. मोठे बॅनर, उद्घाटन समारंभ, कार्यकर्त्यांचे स्वागत – सगळीकडे निवडणुकीचा माहोल तयार झाला होता.
मात्र, अपेक्षेप्रमाणे निवडणुकीची तारीख जाहीर न झाल्याने अनेकांचे उत्साह मावळले. भाडेतत्त्वावर घेतलेली कार्यालये काही महिन्यांतच ओझं ठरू लागली. भाडं, वीज, पाणी, कार्यालयीन खर्च – हे सगळं पेलवेनासं झाल्यानं काही इच्छुकांनी आपल्या कार्यालयांना टाळे लावले. काहींनी तर कार्यालयांची नावफलकंही उतरवली. निवडणुकीचे वारे जणू शांत झाले होते.
पण आता पुन्हा निवडणुकीची चाहूल लागल्याने वातावरण पुन्हा तापले आहे. निवडणूक आयोगाकडून महत्त्वाची घोषणा आणि प्रभाग रचना जाहीर होताच अनेकांनी पुन्हा कामाला सुरुवात केली. रातोरात ‘मीच उमेदवार’ असा आत्मविश्वास उमटू लागला. सोशल मीडियावर प्रचाराची सरशी सुरू झाली. “मी आहे, तू घाबरू नकोस, तुझा भाऊ महापालिकेत गेला की तुझं काम झालं समज” अशा संवादांतून इच्छुकांनी जनतेला आणि कार्यकर्त्यांना पुन्हा जवळ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
याच पार्श्वभूमीवर सिडकोतील अनेक प्रभागांमध्ये ‘कार्यकर्त्यांना जागं करण्यासाठी’ मद्यवाटपाचे प्रकार घडत असल्याची जोरदार चर्चा आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून काही कार्यकर्ते निष्क्रिय होते. त्यांना पुन्हा ‘सक्रिय’ करण्यासाठी बाटल्यांचा आधार घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही ठिकाणी कार्यकर्त्यांना घरी जाऊन बाटल्या देण्यात आल्याचे, तर काही ठिकाणी रात्रीच्या ‘गुप्त मैफिली’ झाल्याचेही बोलले जात आहे.
या ‘दारू वाटप मोहिमेचे’ फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्सअॅप तसेच फेसबुकवर व्हायरल झाले आहेत. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी आनंदात फोटो शेअर केल्याने हे प्रकरण उघड झाले आहे. परिणामी, आता या प्रकारावरून निवडणूक विभागाचे लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे.
सिडको परिसरात ‘बाटली राजकारण’ पुन्हा एकदा रंगात आले आहे. अनेक कार्यकर्ते नव्या जोशात दिसत असले तरी, या नशेचा उतरता काळ कोण आणणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे — “कोणाचा बाटलीचा प्रभाव जास्त, आणि कोणाचा उतरता येईल आधी?”
सध्या सिडको परिसरात या वाटप मोहिमेचे फोटो, चर्चा आणि राजकीय अडथळे यांच्या भोवती राजकारणाचे तापमान चांगलेच वाढले आहे. येत्या काही दिवसांत या ‘मैफिलीं’ची चर्चा निवडणूक वातावरण आणखी पेटवणार, हे निश्चित मानले जात आहे.
