पोस्को गुन्ह्यातील संशयित आरोपी पवननगर चौकीतून पसार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा
नितीन चव्हाण
नाशिक (११ ऑगस्ट) – काही तासांपूर्वी पवननगर पोलिस चौकीतून पोस्को (POCSO) कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेला संशयित आरोपी पोलिसांना चकवा देऊन पसार झाला होता. परंतु, पोलिसांनी अतिशय तत्परता आणि चिकाटीने तपास करत केवळ २४ तासांत आरोपीला पुन्हा ताब्यात घेतले. या कार्यवाहीमुळे अंबड पोलीस ठाणे व पवननगर चौकीचे अधिकारी व कर्मचारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पसार झालेला आरोपी –
संशयिताचे नाव अतुल तुंबडे (वय २० वर्षे, रा. राहता) असे आहे. पोस्को कायद्यांतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा त्याच्यावर दाखल असून, त्याला पवननगर पोलिस चौकीत चौकशीसाठी आणण्यात आले होते. मात्र, चौकशीदरम्यान त्याने पोलिसांची नजर चुकवून पलायन केले.
पोलिसांची तत्काळ कारवाई –
घटनेची माहिती मिळताच पवननगर चौकीचे गिरी तसेच उपनिरीक्षक सविता हुंदे यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विविध ठिकाणी तपासाचे जाळे पसरवले.
२४ तासांत लावला छडा –
अतुल तुंबडे याने पलायन केल्यानंतर त्याचे मोबाईल लोकेशन, ओळखीच्या व्यक्तींशी संबंध आणि पूर्वीच्या राहण्याच्या ठिकाणांची माहिती घेऊन पोलिसांनी त्याचा माग काढला. या तपासादरम्यान आरोपी नेहमी नशेच्या आहारी गेलेला असल्याचे समजले. अखेर २४ तासांच्या आत पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतले.
सर्वत्र कौतुक –
ही यशस्वी कारवाई केल्याबद्दल पवननगर चौकीतील उपनिरीक्षक सविता हुंदे, कर्मचारी व अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांची तत्परता आणि कार्यक्षमतेमुळे गुन्हेगाराला लवकरात लवकर न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचवण्यात यश मिळाले आहे.
