चारशे कोटींची जलशुद्धीकरण निविदा प्रक्रिया नियमबाह्य
शिवसेनेच्या प्रविण (बंटी) तिदमे यांची आयुक्तांकडे तक्रार
नाशिक नितीन चव्हाण :,
नाशिक महापालिकेच्या सुमारे चारशे कोटी रुपयांच्या जलशुद्धीकरण आणि जलवाहिनी योजनेच्या निविदेत डिफेक्ट लायबिलिटी नाही, दिलेल्या कालावधीत काम अपूर्ण राहिल्यास दंडाची तरतूद नाही, इलेक्ट्रिकल स्विचगिअर यंत्रणांसाठी आवश्यक भारतीय मानक कोड नसल्याने या निविदेत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक त्रुटी, नियमभंग आणि अपारदर्शक बाबी आढळून आल्याची तक्रार शिवसेना महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
नाशिककरांच्या आणि शासनाच्या पैश्यांची उधळपट्टी करणारी ही निविदा प्रक्रिया तातडीने रद्द करण्याची मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे.
शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या निविदेमध्ये जलशुद्धीकरणासाठी कोणते तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे, याचा स्पष्ट उल्लेख नाही. तसेच भारत सरकारच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता संस्था आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आवश्यक असलेले तांत्रिक निकषही नमूद केलेले नाहीत. निविदेतील एम एस पाइपसाठी नमूद केलेला दर हा शासनाच्या अधिकृत दरपत्रकाच्या तुलनेत अकरा हजार चारशे रुपये प्रति मीटरने अधिक असून, त्यामुळे सुमारे वीस कोटी रुपयांचा अनावश्यक खर्च होणार असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
योजना शासनमान्य असल्याचा दावा करण्यात आला असला तरी, त्यासंदर्भातील कोणतेही अधिकृत आदेश अथवा प्रशासकीय मंजुरीचे दस्तऐवज निविदेसोबत जोडलेले नाहीत, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
पाइपलाइन, वीज आणि स्वयंचलित नियंत्रण व्यवस्थेमध्ये वापरण्यात येणाऱ्या डक्टाइल आयर्न पाइप, वेरियेबल फ्रिक्वेन्सी ड्राइव्ह, उच्च व निम्न दाब विद्युत पटल आणि स्विचगिअर यंत्रणांसाठी आवश्यक भारतीय मानक कोड, गुणवत्ता निकष किंवा मान्यताप्राप्त उत्पादकांची यादी दिलेली नाही. त्यामुळे गुणवत्तेची खात्री देता येत नाही,
असे या आक्षेपात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच काम अपूर्ण राहिल्यास दंड आकारणी, दोष निवारण कालावधी आणि कामगार सुरक्षेबाबतची अटीही निविदेमध्ये अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. संपूर्ण निविदा प्रक्रियेत अनेक तांत्रिक त्रुटी ठेवल्यामुळे भविष्यात कामाच्या गुणवत्तेविषयी शंका निर्माण होत आहे. भविष्यात जनतेच्या पैसे देखभाल दुरुस्तीवरच अधिक खर्च होतील. यामुळे ही निविदा ठराविक, विशिष्ट ठेकेदाराला अनुकूल ठरेल, अशा प्रकारे तयार करण्यात आली असल्याचा संशय निर्माण झाल्याचे शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांनी म्हटले आहे. या निविदेला तात्काळ स्थगिती देऊन नव्याने कायदेशीर, पारदर्शक आणि तांत्रिक निकषांवर आधारित प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
