इंदिरानगर पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी: तोतया पोलीस जेरबंद
Nashik,नाशिक:, नितीन चव्हाण
इंदिरानगर परिसरात स्वतःला पोलीस असल्याचे भासवून नागरिकांमध्ये भ्रम निर्माण करणाऱ्या ३६ वर्षीय प्रविण पंडीत गोसावी (रा. चंद्रमौली अपार्टमेंट, स्वराज्यनगर, पाथर्डीफाटा, नाशिक) या इसमाला इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तात्काळ सापळा रचून अटक केली आहे.
पो. हवा/ पवन परदेशी यांना गुप्त माहिती मिळाली की, सम्राट स्वीट्स, पांडवनगरी परिसरात एक इसम पोलीस दलातील वर्दी व ओळखचिन्हे परिधान करून फिरत आहे. सदर माहितीची खातरजमा करून गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार पो. हवा. परदेशी, पोशि सागर कोळी, पोशि अमोल कोथमिरे, पोशि सौरभ माळी यांनी तत्काळ सापळा रचून गोसावी याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे नाव, गाव व नेमणुकीबाबत विचारणा केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याला पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता तो पोलीस नसल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २०५, ३१८(२), ३१९(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईसाठी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, उप आयुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे व गुन्हे निरीक्षक सुनिल अंकोलीकर यांनी मार्गदर्शन केले. पुढील तपास बी डी सोनवणे करत आहेत.
या कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये पोलीस दलाबाबत विश्वास वाढला असून, अशा फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
