खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी जेरबंद ;
गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई
सिडको प्रतिनिधी:,
मागील दोन महिन्यांपासून फरार असलेल्या खुनाच्या प्रयत्नातील मुख्य आरोपी मयूर तांबे याला गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अटक केली आहे. आरोपी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यातून फरार होता.
इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिनांक १५ मार्च २०२५ रोजी दाखल गुन्ह्यात फिर्यादी हे रिक्षाने घरी जात असताना स्वप्नील सोनकांबळे व त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. तसेच रिक्षाचे नुकसान व खिशातील ४,००० रुपये जबरदस्तीने चोरले होते. याप्रकरणी भादंवि कलम १०९(१), ११५(२), ११९(१), ३२४(२), तसेच हत्यार कायद्यानुसार कलम ४/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्यातील मुख्य आरोपी मयूर अशोक तांबे (वय २८, रा. मोरवाडी गाव, सिडको, नाशिक) हा घटनेनंतर फरार होता आणि आपले अस्तित्व लपवून बाहेर राज्यात राहात होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उप आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव आणि सहा. आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखा युनिट २ या आरोपीचा शोध घेत होते.
आज १४ मे रोजी पोहवा मनोहर शिंदे व पोअंम तेजस मते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मयूर तांबे साठे नगर, वडाळा गाव परिसरात असल्याचे समजले. सपोनि हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून त्याला शिताफीने अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी सपोनि हेमंत तोडकर, पोउनि यशवंत बेंडकोळी, सपोउनि बाळु शेळके, पोहवा मनोहर शिंदे, प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, पोअं तेजस मते, आणि सुनिल खैरणार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
