सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक : अंबड पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सिडको प्रतिनिधी:,
अंबड पोलीस ठाण्यात एका महिलेची विश्वासघात करून सुमारे ४५.९ ग्रॅम सोन्याचे दागिने अपहार केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी राजश्री कुंडलिक खेमाडे (वय ४८ वर्षे, रा. संतकबीर नगर, आनंदवली, नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी संगणमत करून दीर्घ कालावधीपासून त्यांची फसवणूक केली.
हा प्रकार १६ जून २०२३ पासून सुरु असून, तो १८ एप्रिल २०२५ पर्यंत चालू होता. हा प्रकार नाशिकमधील त्रिमूर्ती चौक उंटवाडी येथील धनवर्षा बँकेच्या परिसरात घडला. आरोपी अभिजीत डोळस, आरती जगताप, महेश रमेश पिंगळे आणि रत्ना कुमावत (सर्व रा. धनवर्षा बँक परिसर, त्रिमूर्ती चौक) यांनी विविध सबबी सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्या कडील एकूण अंदाजे ₹१,७५,०००/- किंमतीचे ४५.९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अपहार केले.
फसवणूक झालेल्या दागिन्यांमध्ये ११.५ ग्रॅम वजनी सोन्याचे मिनी गंठन, पतीची १२.७ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ४ ग्रॅमची अंगठी, ३.५ ग्रॅमचे ओमपान, ८.२ ग्रॅमच्या चार मंगळसूत्राच्या वाट्या, व ६ ग्रॅम वजनाचे कानातील झुंबर यांचा समावेश आहे.
फिर्यादीने हा प्रकार लक्षात आल्यावर अंबड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३१८(४), ३१६(२), ३१६(५), आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलीस निरीक्षक हांडे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आहे.
फसवणुकीच्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांनी अशा प्रकारांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
