Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

सिडको प्रभाग ३१ मधील समस्यांवर भाजपचा हंडा मोर्चा; शेकडो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

 सिडको प्रभाग ३१ मधील समस्यांवर भाजपचा हंडा मोर्चा; शेकडो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

सिडको:, नितिन चव्हाण


 सिडको प्रभाग क्रमांक ३१ मध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिक विविध समस्यांनी त्रस्त आहेत. भीषण पाणीटंचाई, खराब रस्ते, अपूर्ण लाईट व्यवस्था आणि डिव्हायडरची कमतरता यामुळे नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने बाळकृष्ण शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली सिडको विभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिलांचा विशेष सहभाग होता. त्यांनी डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन आणि हातात भाजपचे झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.


या मोर्चात पाथर्डी, सराफ नगर, जायभावे नगर, ज्ञानेश्वर नगर, मुरलीधर नगर आणि वासन नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांबरोबरच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकही मोर्चात सामील झाले होते. "महापालिकेचे अधिकारी पेलवत नाही जबाबदारी", "जय भवानी, जय शिवाजी", "छत्रपती शिवाजी महाराज की जय" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.


या आंदोलनासाठी मोठ्या खाजगी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती, जेणेकरून नागरिक सहजपणे सिडको विभागीय कार्यालयात येऊ शकतील. ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. मोर्चादरम्यान स्पीकरवरून सातत्याने घोषणा देण्यात येत होत्या. त्यामुळे काही काळ सिडको परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पोलीस प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करून बंदोबस्त ठेवला होता.


या आंदोलनात बाळकृष्ण शिरसाठ यांच्यासह माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड, भाजपचे भगवान दोंदे, ॲड. शाम बडोदे, साहेबराव आव्हाड आदी नेतेमंडळी उपस्थित होते. त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आणि समस्यांवर त्वरित तोडगा काढण्याची मागणी केली.


महिलांनीही आपली व्यथा मांडताना प्रशासनाच्या उदासीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. "आम्हाला दररोज पाण्यासाठी लांब जायला लागतं. लहान मुले, आजारी व्यक्ती, वृद्ध यांना यामुळे खूप त्रास होतो. रस्ते खराब आहेत, रात्री लाईट नसल्यामुळे महिलांना सुरक्षित वाटत नाही," असे एका रहिवाशिनीने सांगितले.


हा मोर्चा शांततेत पार पडला असला तरी नागरिकांनी असा इशारा दिला की, जर वेळेत उपाययोजना झाल्या नाहीत, तर यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. नागरिकांच्या या सामूहिक कृतीमुळे प्रशासनाला आता तरी जाग येईल, अशी अपेक्षा आहे.


प्रतिक्रिया :,

 प्रभाग क्रमांक ३१ मधील नागरी समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पाणीटंचाईमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची स्थिती दयनीय आहे आणि लाईट तसेच डिव्हायडरच्या अभावामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. म्हणूनच आम्ही  मोर्चाच्या माध्यमातून आवाज उठवला आहे.


बाळकृष्ण शिरसाठ, आंदोलन, आयोजक

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.