खंडणीसाठी पतीसह महिलेला मारहाण.....
सिडको प्रतिनिधी:,
अंबड एमआयडीसी परिसरात खाजगी नोकरी करणाऱ्या एका महिलेवर व तिच्या पतीवर खंडणीसाठी अत्याचार, मारहाण आणि धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात नितीन पाटील, त्याचा साथीदार तुषार आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर चार ते पाच इसमांविरोधात भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी गौरी सुबोध शहाणे (वय ५१, रा. धृवनगर, गंगापूर रोड, नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१८ पासून आरोपी नितीन पाटील व त्याच्या साथीदारांनी व्याजाच्या नावाखाली बेकायदेशीर पद्धतीने वेळोवेळी पैसे मागितले. ३ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११.२७ वाजता आरोपींनी त्यांच्या पतीकडून जबरदस्तीने २० लाख रुपये घेतले.
यावेळी फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करत, तिच्या अंगाला वाईट उद्देशाने हात लावत तिचे एक तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले. तसेच कोयत्याची धमकी देऊन जीवे मारण्याची धमकीही दिली.
पुढील दिवशी साडेतीन लाख रुपये रोख आणि आयसीआयसीआय व टीजेएसबी बँकेचे २८ चेक जबरदस्तीने लिहून घेण्यात आले. त्यानंतर फिर्यादीच्या पतीस गाडीवर जबरदस्तीने बसवून पाथर्डी फाट्यावर नेण्यात आले व तेथे मारहाण करून जखमी करण्यात आले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे व सहायक पोलीस निरीक्षक भंडे करत आहेत. आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथकांनी शोधमोहीम सुरु केली आहे.
