प्रस्तावित एमआयडीसी पोलिस स्टेशनला तातडीने मान्यता द्यावी
आ.हिरेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना साकडे
सिडको:, नितिन चव्हाण
सिंहस्थ काळात परराज्यांमधून शहरात रोज लाखो भाविक येणार असल्याने शहर आणि परिसरातील प्रशासनावर अधिकचा मोठा भार पडणार असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.यातूनच सिडकोवासियांना दिलासा देण्यासाठी सातपूर आणि अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करावे. तसेच प्रस्तावित असलेल्या एमआयडीसी पोलिस स्टेशनला लवकरात लवकर मान्यता देवून इमारत उभारणीकामी निधी उपलब्ध करून देण्याचे साकडे आमदार सिमाताई हिरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातले आहे.
पश्चिम विधानसभा मतदार संघात अंबड आणि सातपूर अशा दोन मोठया औद्यागिक वसाहती आहेत.आजमितीस अंबड,सातपूर हे दोन मोठे पोलिस स्टेशन कार्यरत असून या पोलिस ठाण्यांवरील कार्यभार कमी करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून एमआयडीसी पोलिस चौकी कार्यरत केलेली आहे.आजमितीस चौकीवर सक्षम पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती करून चौकीला तात्तपुरते पोलिस स्टेशनचे स्वारूप देण्यात आलेले आहे.सदर चौकीला पोलिस ठाण्याचा अधिकृत दर्जा देवून पोलिस ठाण्याची उभारणी करण्याची मागणी उद्योजकांसह नागरिकांकडून होत आहे.या विषयीचा स्थानिक पोलिस प्रशासनाकडून राज्य शासनासकडे पाठविलेला प्रस्ताव गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे.
आ. सिमा हिरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेत पोलिस ठाण्याच्या मान्यतेसाठी विशेष पत्र दिले.शहरातील झ्तर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडणाऱ्या गुन्हयांइतकेच गुन्हे एमआयडीसी पोलिस चौकीच्या हद्दीत घडत असल्याचे यावेळी आ.हिरेंनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.पंरतू अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अपूरी संख्या तसेच इमारतीचा अभाव यामुळे पोलिस प्रभावीपणे काम करू शकत नसल्याची व्यथा आ.हिरेंनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.आगामी सिहंस्थ काळात भाविकांची वाहने याच चौकीच्या हद्दीतून जाणाऱ्या गरवारे -चिंचोळे मार्गे नाशिक -त्र्यंबकेश्वर रस्त्याला जोडली जात असल्याने सिंहस्थ काळात वाहतूक कोंडीची मोठी समस्या भेडसावणार आहे.वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी प्रस्तावित एमआयडीसी पोलिस स्टेशन उभारणीच्या प्रस्तावास तातडीने मंजूरी द्यावी आणि आवश्यक अधिकारी,कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ आणि बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे साकडे यावेळी आ.हिरेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांना घातले आहे.
