अमली पदार्थ विक्री प्रकरणी पोलीस हवालदारच झाला आरोपी..
नाशिक प्रतिनिधी:,
नाशिक पोलीस दलातील पोलीसहवालदाराला गुन्हेगारांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस आयुक्तांनी सहआरोपी करीत त्याला निलंबित केले आहे.
थेट पोलीस हवालदाराला आरोपी करून त्याचे निलंबन केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. तर आयुक्तांनी अशाच पद्धतीने विविध पोलीस ठाणे, गुन्हे शाखेमधील सुभेदारांच्या फोन रेकॉर्डची तपासणी करून त्यांच्यवर देखील कारवाई करावी अशी चर्चा पोलीस वर्तुळात सुरु झाली आहे.
पंचवटी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार युवराज शांताराम पाटील असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एक आदेश काढून युवराज पाटील याला निलंबित केले आहे.
या आदेशामध्ये म्हटले आहे की, पोलीस हवालदार युवराज पाटील याचा भद्रकाली, इंदिरानगर, नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या गुन्हेगारांशी मोबाईलद्वारे वारंवार संपर्क आणि संभाषण झाले आहे. तसेच, इंदिरानगर, भद्रकाली पोलीस ठाणे येथे गोवंश मांस विक्री, वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारांशी मोबाईलद्वारे कायम संपर्क आणि संभाषण झाले असल्याचे दिसून आले आहे. तसेच, इंदिरानगर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ गुन्ह्यात पाटील याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याचा पाहिजे आरोपी म्हणून समावेश यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पाटील हा
अंमली पदार्थ विक्रीमध्ये सहआरोपी करण्यात आला आहे.
त्यामुळे पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी महत्वाच्या पदावर कार्यरत असताना आणि नियम-विनियमांची जाणीव असताना देखील गोपनीयतेचा भंग केल्याचा ठपका ठेवत पोलीस खात्याच्या शिस्तीस न शोभणारे वर्तन केल्याने निलंबित केल्याचे आदेश आहे.
निलंबित कार्यकाळात पाटील याला राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय येथे दिवसातून दोनवेळा हजेरी देण्याचे आणि परवानगी शिवाय मुख्यालय न सोडण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे.
