देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त..
सिडको प्रतिनिधी:,
अंबड परिसरातील संजिवनगर, इंडियन पेट्रोल पंपाजवळ विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका 23 वर्षीय युवकावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहबुब मुमताज अहमदखान (वय 23, रा. विराटनगर, अंबड लिंक रोड, चुंचाळे शिवार) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याजवळ देशी बनावटीची लोखंडी पिस्तूल, प्लास्टिक कव्हरसह मॅगझीन, व “KF 7.65” असे इंग्रजीत कोरलेले एक जिवंत पितळी काडतूस सापडले आहे. या शस्त्रसाहित्याची एकूण किंमत अंदाजे ३०,५०० रुपये इतकी आहे.
ही कारवाई 3 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास पोलिसांनी केली. आरोपीकडे शस्त्र परवाना नसल्याने आणि त्याने शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर शस्त्र अधिनियम कलम 3/25 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिस उपनिरीक्षक शेवाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक 248/2025 दाखल झाला असून, गुन्हे शाखा युनिट-2 चे पोलीस अंमलदार महेश खांडबहाले यांनी ही कारवाई केली. आरोपी अद्याप फरार असून पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.
