तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
सिडको प्रतिनिधी:,
अंबड लिंक रोड परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अनिल रामदास महाले (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, त्यांनी काहीतरी वैयक्तिक कारणातून राहत्या घराच्या किचनमध्ये साडीच्या सहाय्याने सिलींगच्या हुकला गळफास लावून जीवन संपवले.
ही घटना दि. १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. गळफास घेतल्यावर ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांच्या भावाने सुनिल रामदास महाले यांनी तात्काळ त्यांना सिव्हील हॉस्पिटल, नाशिक येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टर घुटे मॅडम यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. ही घटना दुपारी ११:५० वाजता घडल्याचे रेकॉर्ड आहे.
घटनेची माहिती मिळताच सिव्हील पोलीस चौकी, नाशिक शहर येथील पोहवा चव्हाण, वपोनि हांडे आणि पोहवा जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अनिल महाले यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस अधिक तपास करत असून, मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.
