सिडकोत मध्यरात्री इरटिगा गाडीवर हल्ला;
चार जणांविरोधात अंबड पोलिसांत गुन्हा दाखल....
सिडको प्रतिनिधी:,
सिडको परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकाच्या गाडीवर चार जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात इरटिगा गाडीच्या दोन्ही बाजूच्या काचा फोडण्यात आल्या असून धारदार शस्त्राने गाडीवर हल्ला करून गंभीर दहशत निर्माण करण्यात आली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी निशांत संजय गुंडे (वय २५, रा. समता चौक, राजवाडा, कामठवाडे, नाशिक) हे दि. १५ एप्रिल रोजी रात्री १२.३० च्या सुमारास स्वतःच्या MH05 XX 5050 क्रमांकाच्या इरटिगा गाडीने घरी जात होते. ते सिडकोतील सुलभ शौचालय जवळ आले असताना राजा वाकळे, अर्जुन वाकळे आणि त्यांच्या दोन साथीदारांनी त्यांची गाडी अडवली.
रस्त्यात गाडी अडवून गार्ड करत त्यांनी गाडीच्या दोन्ही बाजूच्या काचा फोडल्या. इतक्यावरच न थांबता, त्यांनी गाडीच्या आत दगड फेकून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर धारदार शस्त्राने गाडीच्या बोनटवर वार करण्यात आला आणि गंभीर स्वरूपाची शिवीगाळ करत दमदाटी करण्यात आली.
घटनेनंतर निशांत गुंडे यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उंडे आणि पोहवा बनतोडे तपास करत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
या घटनेमुळे सिडको परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी रात्रो उशिरा प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
