जुन्या वादातून युवकावर प्राणघातक हल्ला
सिडको प्रतिनिधी:,
जुन्या भांडणाची कुरापत काढून सिडको येथे एका युवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. सुमित देवरे (वय ३०) या युवकावर अरुण वैरागड याने चोपरने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना सिडकोतील शुभम पार्क जवळील सेंट जोसेफ चर्चसमोर घडली.
सुमित देवरे गंभीर जखमी झाल्यानंतर पोस्ट पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश हांडे यांनी स्वतः पुढाकार घेत त्याला उचलून पोलीस गाडीत टाकले आणि तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, ऐन होळीच्या सणादिवशी हा प्रकार घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच दुय्यम पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आणि सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी बंदोबस्त लावला.
प्राथमिक तपासानुसार, हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी मोठ्या संख्येने जमाव गोळा झाला होता, त्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसरत करावी लागली. जखमी सुमित देवरेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या प्रकरणी आरोपी अरुण वैरागड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. होळीच्या सणावर या घटनेमुळे विरजण पडले असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
