सिडको प्रतिनिधी:-
जुन्या भांडणाची कुरापत काढून सिडको येथे एका युवकावर तीन ते चार जणांनी प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केला. सुमित देवरे (वय २२) याच्यावर अरुण वैरागड आणि त्याच्या साथीदारांनी चोपरने वार करून त्याचा निर्घृण खून केला. ही घटना सिडकोतील शुभम पार्क जवळील सेंट जोसेफ चर्चसमोर घडली.
सुमित देवरे हा सटाणा येथे शिक्षण घेत होता. तो गंगेश्वर, महाजन नगर येथे कुटुंबासोबत राहत होता. एकुलता एक असल्यामुळे त्याच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुमित आणि अरुण वैरागड हे पूर्वी चांगले मित्र होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. त्याच वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. सुमित देवरे गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता. माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि स्वतः पुढाकार घेऊन सुमितला पोलीस गाडीतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, होळीच्या सणाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे, मधुकर कड, दुय्यम पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आणि सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी तातडीने बंदोबस्त लावला. मोठ्या संख्येने नागरिक जमल्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसरत करावी लागली.
या प्रकरणी अरुण वैरागड याच्यासह अन्य दोन ते तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात केली असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
या घटनेमुळे सिडको परिसरात तणाव निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गस्त वाढवली आहे. होळीच्या सणावर या हत्याकांडामुळे विरजण पडले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
