सिडको प्रतिनिधी:-
अंबड पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत भगतसिंग चौक येथून विष्णू मुंजाभाऊ वजीर (३५, रा. भगतसिंग चौक, सिडको) याला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली. पोलिसांनी त्याच्या घरातून दोन धारदार कोयते जप्त केले असून, त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा ४/२५ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस शिपाई समाधान शिंदे यांनी पोलीस उपनिरीक्षक झेड. एन. गुनावत यांना माहिती दिली. त्यानुसार तपास अंमलदार पोलीस हवालदार देशमुख आणि पथकाने विष्णू वजीर याच्या घराची झडती घेतली असता तेथे दोन धारदार कोयते आढळून आले.
त्यानंतर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आणि त्याच्यावर अंबड पोलीस ठाण्यात २१४/२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
