सिडको प्रतिनिधी:,
बँकेत तसेच विमानतळावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने तरुणीची तब्बल १.५५ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात आरोपी विकास प्रकाश मुंढे (रा. सातपूर, नाशिक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी बरखा तलरेजा (रा. आनंदनगर, नाशिकरोड) या खासगी नोकरी करणाऱ्या तरुणीला २०२२ मध्ये फेसबुकवर बँकेत नोकरीची जाहिरात दिसली. त्यावर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधताच आरोपीने बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी लावून देतो असे सांगून विविध कारणांनी तिला रक्कम भरण्यास प्रवृत्त केले.
शैक्षणिक कागदपत्रे गोळा केल्यानंतर आरोपीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, इंटरव्ह्यू शुल्क, जागा बुकिंग अशा विविध कारणांसाठी वेळोवेळी पैशांची मागणी केली. त्यावर विश्वास ठेवून पीडित तरुणीने फोन पे आणि रोख स्वरूपात १ लाख ५५ हजार रुपये अदा केले. मात्र, नोकरी न लागल्याने तिला फसवणुकीची जाणीव झाली.
या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुंढे करीत आहेत. नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
