नाशिक:, प्रतिनिधी
शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्ल्यांमध्ये अनधिकृतपणे लोखंडी गज आणि पट्ट्यांची वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी मनसेचे पदाधिकारी अर्जून वेताळ यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून या प्रकारात वाढ झाली असून, कोणतीही परवानगी न घेता ही अवैध वाहतूक केली जात आहे. मोठ्या वाहनांमधून हे लोखंडी गज शहराच्या मुख्य रस्त्यांवरून तसेच गल्ल्यांमध्ये नेले जात आहेत. यासाठी सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. काही ठिकाणी तर फक्त चिंध्या आणि लाल फडकी लावून ही वाहतूक सुरू आहे.
या आधीही अशा प्रकारच्या वाहतुकीमुळे अपघात घडले आहेत. विशेषतः द्वारका परिसरात झालेल्या अपघातानंतरही वाहनधारक, विक्रेते आणि प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला नाही. केवळ एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येते आणि नंतर पुन्हा दुर्लक्ष केले जाते, अशी नागरिकांची तक्रार आहे.
सिडकोत भरवस्तीतून होणारी धोकादायक वाहतूक त्वरित थांबवावी, तसेच या वाहनांवर योग्य नियंत्रण ठेवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
