सिडको प्रतिनिधी:,
अंबड एमआयडीसी परिसरातील सुपरनेल कंपनीच्या आवारात खेळताना पाण्याने भरलेल्या बादलीत पडून चार वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रागनी मनोजकुमार वनवासी (रा. सुपरनेल इंडस्ट्रिअल, ग्लॅस्को बसस्टँडसमोर, एमआयडीसी अंबड, नाशिक) असे मृत बालिकेचे नाव आहे.
शनिवारी (दि. २२) दुपारी १ वाजता ही हृदयद्रावक घटना घडली. रागनीच्या आई-वडिलांचे काम सुरू असताना ती आंघोळीच्या जागेवरील मोठ्या बादलीत पाणी खेळत होती. त्याच वेळी तिचा तोल गेल्याने ती बादलीत पडली. नाक आणि तोंड पाण्यात अडकल्याने तिचा श्वास गुदमरला व बेशुद्ध झाली.
कुटुंबीयांनी तिला शोधून तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे अंबड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
