सिडको प्रतिनिधी:-
शहरातील सिडको परिसरात भरदिवसा एका पत्रकारास मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. आरोपींनी फिर्यादीला धमकी देत त्याच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.
फिर्यादी साईप्रसाद अनिल पाटील (वय ३४, रा. नाशिक) हे दुपारी १ वाजता दत्त चौक, सिडको येथे जात असताना, राहुल काशीनाथ शेळके (वय ३८) आणि रमजान राजू शेख (वय २५) या दोघांनी त्यांना अडवले. रमजान शेख याने फिर्यादीची कॉलर धरून त्यांना खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, "जे काही आहे ते दे नाहीतर जिवंत सोडणार नाही" अशी धमकी देत खिशातील २०० रुपये व विवो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला.
या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी तात्काळ कारवाई करून दोन्ही आरोपींना अटक केली. कलम ३११, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे करीत असून, गुन्हा पोलीस हवालदार पंकज शिरवले यांनी दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
