अंबड पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी; रिक्षा चोरी करणारा आरोपी मुद्देमालासह ताब्यात
सिडको/ नितिन चव्हाण
नाशिक शहरात वाहन व मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस उप आयुक्त (परिमंडळ–२) श्री. किशोर काळे व मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. सचिन बारी यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आरोपींचा शोध घेऊन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत स्पष्ट सूचना व मार्गदर्शन दिले होते. त्यानुसार अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने रिक्षा चोरीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीस चोरीच्या रिक्षासह ताब्यात घेतले आहे.
अंबड पोलीस ठाणे, नाशिक शहर येथे अशोक विठ्ठल धनगर (वय ४०, व्यवसाय रिक्षा चालक, रा. कामटवाडे, नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विशाल वाईनजवळ रस्त्याच्या कडेला उभी केलेली त्यांची काळ्या रंगाची व पिवळ्या पट्ट्याची रिक्षा (एम.एच. १५ ई.एच. ७१२१) अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ९४१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपी व चोरी गेलेल्या रिक्षाचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अनिल गाढवे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चोरीची रिक्षा घेऊन एक इसम भारती बंगल्याजवळ, स्टेट बँक चौक, सिडको परिसरात उभा आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे सपोनि विलास पडोळकर, पोशि अनिल गाढवे, मयुर पवार व सागर जाधव यांनी त्या ठिकाणी सापळा रचून संशयित इसमास चोरीच्या रिक्षासह ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीस अंबड पोलीस ठाण्यात आणून विश्वासात घेऊन व कौशल्यपूर्ण तपास केल्यानंतर त्याने अंबड पोलीस ठाणे हद्दीतून रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली. या कारवाईत सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अंबड पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, मा. पोलीस उप आयुक्त किशोर काळे, सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सपोनि विलास पडोळकर, पो.हवा. योगेश देसले, पोशि अनिल गाढवे, मयुर पवार, सागर जाधव, योगेश शिरसाठ व सचिन करंजे यांनी पार पाडली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.हवा. योगेश देसले व पोशि वैभव एखंडे हे करीत आहेत.
