ते बोलतात… ते करतात! प्रभाग २४ मध्ये विकासाची नवी पहाट — प्रवीण (बंटी) तिदमे यांच्या कामगिरीची जोरदार चर्चा
नविन नाशिक :,नितिन चव्हाण
प्रभाग क्रमांक २४ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विकासकामांचा वेग मंदावलेला होता. रस्त्यांची दयनीय अवस्था, ड्रेनेज लाईनची समस्या, पेवर ब्लॉकचे अपुरे काम, सभा मंडपांचे रखडलेले प्रस्ताव—अशा अनेक मूलभूत सुविधांकडे दीर्घकाळ काना-डोळा झाल्याने नागरिकांचा संयम सुटत चालला होता. विशेष म्हणजे, प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर तर लोकप्रतिनिधींकडून या प्रभागाकडे पाहण्याची मानसिकताच संपल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. जवळपास पंधरा वर्षे हा प्रभाग विकासाच्या बाबतीत मागे राहिल्याचे सर्वमान्य वास्तव होते.
या पार्श्वभूमीवर बदलाची मागणी करणाऱ्या जनतेने अखेर प्रभागात नवा चेहरा उभा केला—प्रवीण (बंटी) तिदमे. सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेले, विमान निर्मिती संस्थेत कर्मचारी म्हणून काम करणारे प्रवीण तिदमे यांना नागरिकांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली.
मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाची किंमत जाणून प्रवीण तिदमे यांनी प्रभागातील प्रत्येक घर, प्रत्येक गल्ली, प्रत्येक मताची जाण ठेवत विकासकामांची मालिका सुरू केली. प्रभागात पूर्वी निवडून आलेल्या अनेक माजी नगरसेवकांच्या काळात रखडलेली कामे तिदमे यांनी प्राधान्याने हातात घेतली.
पाण्याचा प्रश्न — कायमस्वरूपी तोडगा
गेल्या काही वर्षांपासून प्रभागात पाण्याचा गंभीर तुटवडा जाणवत होता. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या तरी त्यावर ठोस उपाययोजना होत नव्हत्या. मात्र, प्रवीण तिदमे यांनी पदभार स्वीकारताच पाणीपुरवठ्याची लाईन सुधारणा, नवीन जोडणी, जुने वाल्व बदलणे यांसह मोठी कामे वेगात पूर्ण केली. परिणामी नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला.
रस्ते व पेवर ब्लॉक — डांबरीकरणाला गती
अनेक भागातील रस्त्यांची अवस्था डांबर निघून खड्ड्यांनी व्यापलेली होती. तिदमे यांनी या समस्येवर प्राधान्याने उपाय करत प्रभागातील डांबरीकरण व पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामांना गती दिली. आज अनेक भागांमध्ये नवीन रस्ते, नवे पेव्हर्स आणि स्वच्छ गटारी यामुळे प्रभागाचे रूपडे बदलताना दिसत आहे.
ड्रेनेजची समस्या — तातडीने मार्गी
घरकुल परिसर, नवनाथ नगर, कर्मयोगी नगरसह अनेक ठिकाणी ड्रेनेजच्या समस्या वाढल्या होत्या. नियमित साफसफाई, बंद लाईन दुरुस्ती व नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम करून नागरिकांना मोठा दिलासा दिला.
प्रशासकीय राजवटीतही न थांबलेले काम
प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर बहुतांश प्रभागांतील कामे रखडत असताना प्रवीण तिदमे मात्र अडथळ्यांना न जुमानता नागरिकांच्या कामासाठी धावतच राहिले. ‘उद्घाटनाची कुदळ’ थांबवली नाही—हीच जनतेच्या मनातली त्यांची खरी ओळख.
तिदमे म्हणतात—“मायबाप जनता हाच माझा विकास. दिलेला शब्द मला पडू द्यायचा नाही.”
याच ध्येयातून त्यांनी प्रभागातील प्रलंबित कामे पूर्णत्वास नेली आणि नवी कामेही सुरू केली.
नागरिकांचा वाढता विश्वास
आज प्रभाग २४ मध्ये सुरू असलेल्या कामांच्या वेगाने आणि गुणवत्तेने नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. गल्लोगल्ली कायमस्वरूपी बदल जाणवत असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळते.
प्रवीण (बंटी) तिदमे यांनी प्रभागातील जनतेला दिलेला शब्द पाळत पुन्हा एकदा विकासकामांच्या गतीने प्रभागात नवा जीव ओतल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
