वाहतूक कोंडीने त्रस्त नागरिक : अशोका शाळेजवळील पार्किंग समस्या गंभीर, प्रशासनाचे दुर्लक्ष
नाशिक (प्रतिनिधी) रवी वाघ
नाशिकच्या पखाल रोड व अशोका मार्गाच्या संगमावर असलेल्या अशोका शाळेजवळ पार्किंगची समस्या चिघळत चालली आहे. शाळेसमोरील रस्त्यावर वाहनांची अनियंत्रित गर्दी वाढल्याने दररोज वाहतूक कोंडी निर्माण होते. या गोंधळामुळे नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल होत असून, अपघाताचा धोका देखील वाढला आहे.
शाळेच्या वेळेत तसेच शाळा सुटल्यानंतर दोन्ही बाजूंनी दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावर बिनधास्तपणे उभी केली जातात. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा प्रवाह अडथळलेला राहतो. विशेष म्हणजे, शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुठलीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांचीही सुरक्षितता धोक्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, पोलिस चौकी शाळेपासून काहीच अंतरावर असतानाही वाहतूक कोंडी व बेकायदेशीर पार्किंगवर कुठलीही कार्यवाही होत नाही. यामुळे परिसरातील रहिवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत. त्यांनी यासंदर्भात प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
जर लवकरात लवकर शाळा प्रशासन व पोलीस विभागाने योग्य पावले उचलली नाहीत, तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
