सिडकोत २५ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
सिडको प्रतिनिधी:,
सिडको परिसरात एका २५ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. कोमल सचिन मुंडावरे (वय २५) असे मयत महिलेचे नाव असून, ही घटना ३१ मार्च रोजी दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोमल मुंडावरे या आपल्या पतीसह महालक्ष्मी प्राईड, एकदंत नगर, भोळे मंगल कार्यालयाजवळ, सिडको येथे राहात होत्या. ३१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घरी कोणी नसताना त्यांनी घराच्या हॉलमधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. काही वेळाने कुटुंबीय घरी परतले असता त्या बेशुद्ध अवस्थेत आढळल्या.
त्यांना तातडीने सिव्हील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून रात्री ९.४५ वाजता त्यांना मृत घोषित केले. डॉ. वर्मा यांनी हा अहवाल दिला. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत पोलीस हवालदार उमाकांत टिळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल यांनी आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
