सिडको प्रतिनिधी:,
प्लंबिंग करणाऱ्या तरुणाला कोयत्याचा वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अक्षय ज्ञानेश्वर पाटील (वय २३, रा. अंबड) हा तरुण प्लम्बिंगचे काम करतो. काल (दि. २८) पहाटे साडेतीन वाजेच्या
सुमारास तो घरी होता.
त्यावेळी आरोपी ऋषिकेश साहेबराव नवले (रा. उपेंद्रनगर, अंबड) व त्याचा एक अनोळखी इसम असे दोघे जण फिर्यादी पाटील याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातात कोयता घेऊन घराबाहेर उभे
राहिले.
आरोपी ऋषिकेश नवले याने घराचा दरवाजा तोडण्याच्या उद्देशाने दरवाजावर कोयता मारून त्याचे नुकसान केले, तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन खिडकीवर कोयत्याने वार करून खिडकीच्या काचा फोडल्या.
त्यास प्रतिकार केला असता फिर्यादीच्या हातावर कोयता मारून दुखापत केली व जाताना दोन्ही आरोपींनी पाटील याच्या घरावर दगडफेक करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुगले करीत आहेत.
