नाशिक प्रतिनिधी:,
दरवाजाचे सेफ्टी लॉक व लॅच लॉक कशाच्या तरी सहाय्याने तोडून अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरफोडी करून २२ तोळ्यांच्या दागिन्यांसह रोकड असा सुमारे ६ लाख १२ हजारांचा ऐवज लुटून नेल्याची घटना अशोका मार्ग येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी डॉ. मृणाल शैलेश काळे (रा. अशोका टॉवरच्या समोर, अशोका मार्ग, नाशिक) यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे लॉक अज्ञात चोरट्याने तोडून घराचा सेफ्टी दरवाजा व लॅच लॉक तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरातील कपाटात असलेल्या १ लाख ११ हजार रुपये किमतीच्या ६० ग्रॅम
वजनाच्या सोन्याच्या दोन पाटल्या, २१ हजार ८१६ रुपये किमतीच्या २४ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, ७१ हजार २११ रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची एक बांगडी, १ लाख ४६ हजार ९६० रुपये किमतीच्या ३० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, ११ हजार २५० रुपये किमतीचा २५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, ९६
हजार ६०२ रुपये किमतीचे २४ ग्रॅम वजनाचे लांब सोन्याचे मंगळसूत्र, ६७ हजार २४८ रुपये किमतीचे १८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ४ हजार ५०० रुपये किमतीचा १० ग्रॅम वजनाचा लक्ष्मीहार, २ हजार २५० रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे कानातील झुमके, ८ हजार ५६४ रुपये किमतीच्या २.५० ग्रॅम वजनाच्या कानातील कुड्या, ९१८ रुपये
किमतीचे कानातील टॉप्स, १ हजार ७०० रुपये किमतीच्या दोन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन कुड्या, ४० हजार १६ रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची छोटी चेन, ११८ रुपये किमतीचा १५ ग्रॅम वजनाचा चांदीचा छल्ला, १८ हजार रुपये किमतीचा निकॉन कंपनीचा कॅमेरा व १० हजार रुपये रोख असा एकूण ६ लाख १२ हजार १५३ रुपये किमतीचा ऐवज भरदिवसा घरफोडी करून चोरून नेला.
या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनार करीत आहेत.
