सिडको प्रतिनिधी:-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाण्याद्वारे टीका करणाऱ्या कुणाल कामरा विरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली आहे. यासंदर्भात शिवसेना महानगर महिला आघाडीच्या वतीने सवकारवाडा पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.
कुणाल कामरा यांनी एका शोमध्ये एकनाथ शिंदे यांच्याविषयी विडंबनात्मक गाणे सादर केले होते. या गाण्यात त्यांनी शिंदे यांना ‘गद्दार’ म्हणून उल्लेख केला. त्यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत महिलांनी कुणाल कामरा यांच्यावर त्वरित कारवाई आणि अटकेची मागणी केली आहे.
या वेळी महानगरप्रमुख सौ. अस्मिता देशमाने, नगरसेविका सुवर्णाताई मटाले, सुलोचना मोहिते, प्रणाली पढाया, रोहिणी देवरे, गीता गुप्ता, कीर्ती ठाकूर, मंगल पाटील, शाहीन अन्सारी, अनिता वाघ यांसारख्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
महिला आघाडीने दिलेल्या निवेदनात, “जर पोलिसांनी कुणाल कामरावर कारवाई केली नाही, तर आम्ही त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही,” असा इशाराही देण्यात आला आहे.
या प्रकरणावर सध्या राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, पुढील कारवाईवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
