Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

नाशिक महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच गोंधळाचे राजकारण पक्षांतराचा खेळ आणि चौथ्या स्तंभाची फरफट


नाशिक महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच गोंधळाचे राजकारण

 पक्षांतराचा खेळ आणि चौथ्या स्तंभाची फरफट

सिडको/ नितिन चव्हाण



गेल्या तब्बल दहा वर्षांपासून रखडलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. माजी नगरसेवकांसह अनेक इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारीला सुरुवात केली असली, तरी प्रत्यक्षात मात्र इच्छुकांच्या भूमिकेतील संभ्रम, माघारी आणि पक्षांतरामुळे निवडणूक प्रक्रियेत गोंधळाचे चित्र दिसून येत आहे.

निवडणूक जाहीर होताच अनेक इच्छुकांनी ४० पानी उमेदवारी अर्ज उचलले, मात्र अर्ज हातात घेतल्यानंतरच काही इच्छुकांनी अचानक माघार घेतल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून ‘खरंच लढणार कोण?’ असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सिडकोसह शहरातील अनेक प्रभागांमध्ये उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत असताना, या वातावरणाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची मात्र मोठी फरफट होत आहे. व्हिडीओ शूटिंग, बाईट्स आणि बातम्यांसाठी प्रभागांमध्ये फिरणाऱ्या पत्रकारांना इच्छुक उमेदवारांकडून विचित्र अनुभव येत आहेत.

काही इच्छुक उमेदवारांनी सकाळी दिलेली बाईट किंवा शूटिंग “आमचं अजून फिक्स नाही, बातमी लावू नका” असे सांगून थांबवण्याची विनंती केली. तर काहींनी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतरच “आम्ही दुसऱ्या पक्षात जाणार आहोत” असे सांगून पत्रकारांना अडचणीत आणल्याचे प्रकार घडले आहेत.

या साऱ्या घडामोडींमुळे मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. सतत बदलणाऱ्या भूमिकांमुळे मतदारांनी मतदान नेमकं करावं तरी कोणाला, असा सवाल उपस्थित होत आहे. इच्छुक उमेदवार जर चौथ्या आधारस्तंभाची म्हणजेच पत्रकारांची दिशाभूल करत असतील, तर सामान्य मतदारांची दिशाभूल किती मोठ्या प्रमाणात होत असेल, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

बातमीसाठी आग्रही राहून इच्छुक उमेदवारांना फोन केल्यास अनेकदा थेट संपर्क न होता कार्यकर्त्यांकडेच फोन दिला जातो.

“भाऊ मीटिंगमध्ये व्यस्त आहेत,” “भाऊ कार्यालयात आहेत,” “थोड्या गडबडीत आहेत” अशीच ठरलेली उत्तरे पत्रकारांना मिळत आहेत. अशा परिस्थितीत निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

एखादा इच्छुक उमेदवार पक्ष बदलत असेल, भूमिकेत बदल करत असेल, तर त्याची जबाबदारी पत्रकारांवर ढकलली जाणे कितपत योग्य आहे, असा संभ्रमही या निमित्ताने निर्माण झाला आहे. राजकीय अस्थिरता, इच्छुकांची दुटप्पी भूमिका आणि सतत बदलणाऱ्या निर्णयांमुळे यंदाची नाशिक महापालिका निवडणूक केवळ लढतीपुरती न राहता चर्चेचा विषय ठरत आहे.

आता येत्या काळात कोण उमेदवार टिकून राहतो, कोण माघार घेतो आणि मतदार या साऱ्या गोंधळात काय निर्णय घेतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.