पवननगर दत्त मंदिरात ४२३ भक्तांचे दत्त पारायण सुरू
दत्तजयंतीनिमित्त भव्य महादत्तयाग आणि भव्य महाप्रसादाचे आयोजन
सिडको/प्रतिनिधी
राजरत्ननगर परिसरातील पवननगर येथील श्री दत्त मंदिरात मागील २५ वर्षांपासून गुरुचरित्र पारायण सप्ताहाचे आयोजन सातत्याने होत असून, केवळ ११ भक्तांपासून सुरू झालेल्या या श्रद्धासोहळ्याने आज वटवृक्षाचे स्वरूप धारण केले आहे. यंदा तब्बल ४२३ भक्त दत्त पारायणासाठी बसले असून, भाविकांच्या सहभागाने परिसर पवित्र अध्यात्मिक ऊर्जेने निनादत आहे.पारायणाचार्य शामकांत महाजन हे परायण सांगत आहेत.
शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी दत्त पारायणास प्रारंभ झाला असून आज, गुरुवार ४ नोव्हेंबर रोजी दत्त जयंतीनिमित्त पारायणाची सांगता होणार आहे. सप्ताहात दरवर्षीप्रमाणे गीता जयंती व दीपोत्सव पारंपरिक उत्साहात साजरा झाला. श्री दत्तांच्या चरणी ५६ भोग नैवेद्य अर्पण करण्यात आले.
दत्त जयंती दिवशी पारायण समाप्तीनंतर परिसरात भिक्षा मागून मिळालेल्या अन्नाचे सेवन करत पूर्ण दिवस उपवास पाळण्याची दिव्य परंपरा भक्तगण मोठ्या भावनेने जपत आहेत. सकाळी श्री दत्त मूर्तीवर महाअभिषेक, त्यानंतर पालखी सोहळा, सत्यनारायण पूजाविधी, सायंकाळी दत्त पाळणा–महा आरती आणि दर्शनासाठी आलेल्या भक्तांना महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. दरवर्षी किमान १० हजारांहून अधिक भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात.
यावर्षी सप्ताहाची २५ वर्ष पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती असल्याने ५१ जोडप्यांच्या हस्ते श्री दत्त यज्ञ–होम हवनाचे विधिवत पूजन करण्यात येणार आहे.
संपूर्ण सप्ताह सुरळीत व भव्यतेने पार पाडण्यासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष मनोज हिरे, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, सुभाष बोरसे, अरुण सोनवणे, बबन गडाख, ईश्वरलाल महाले, रमेश सैंदाने, तसेच अवधूत युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रवींद्र सोनवणे व सहकाऱ्यांनी मागील अनेक वर्षांपासून भव्य रक्तदान शिबिर, परिसर स्वच्छता अभियान व इतर सेवा कार्ये सातत्याने राबवली आहेत. सप्ताहासाठी माजी नगरसेवक निलेश ठाकरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
